News@Gadchandur 🚨...
Gadchandur : किरकोळ भांडणातून रागाच्या भरात भामरागड येथून गडचांदूर शहरात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला ठाणेदार शिवाजी कदम यांनी तिच्या नातेवाईकांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे. सदर घटना 29 मार्च शनिवार रोजी रात्रीची असून मुलीला अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्यातील पाटागुडा (टेकामांडवा)येथील चर्चमध्ये तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की,गडचांदूर येथे शनिवारी रात्री जवळपास 9 च्या सुमारास लुकमान मुसा बक्ष,यांना एक तरूण मुलगी एकटीच बसस्थानक परिसरात उभी दिसली.बराच वेळ झाला होता,बसची वेळही निघून गेली होती,मुलगी येथे का उभी आहे? कुठं जायचं आहे? याची विचारणा केली असता 'एका फादर'कडे जायचं आहे,पण त्यांना फोन लागत नाही' असे त्या मुलीने लुकमान बक्ष यांना सांगितले.हल्ली महिलांबाबात विविध घटना घडत असल्याची बाब लक्षात घेऊन,एकटी मुलगी आणि रात्रीची वेळ..? मुलीसोबत काही अनपेक्षित प्रकार घडू नये,यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे फोन करून मुली विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.याची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदार शिवाजी कदम,यांनी तात्काळ तिरुपती माने व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी पाठवून मुलीला पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.
दरम्यान मुलीला विश्वासात घेऊन आपुलकीने विचारपूस केली असता सदर मुलीचे वय 17 वर्ष काही महिने असल्याचे तसेच ती भामरागड येथील असल्याचे समोर आले.येथे कुणाकडे आली! याची माहिती घेत वडिलांचं मोबाइल नंबर घेतला.वडिलांसोबत दुरध्वनीवरून संपर्क करून मुलीबाबत सांगण्यात आले.'ती भांडण करून रागारागाने घरातून निघून गेली,रात्री भामरागड वरून येणे शक्य नाही,सकाळी येऊन घेऊन जातो' टेकामांडवा चर्चमध्ये नातेवाईक असल्याचे वडिलांनी सांगितले.शेवटी चर्च मधील नातेवाइकांना संपर्क साधून रात्री जवळपास 2 च्या सुमारास ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर मडावी,पदमा तेलजिरे,भुषण पवार,लक्ष्मी मेश्राम, या पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिदुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यातील पाटागुडा(टेकामांडवा)चर्चमधील नातेवाईकांच्या ताब्यात मुलीला दिले.मुलीला सुखरूप पोहोचवल्या बद्दल वडिलासह नातेवाईकांनी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कदम व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.सदर प्रकरणी ठाणेदार कदम यांची संवेदनशीलता व कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडले असून गडचांदूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
#Gadchandur Police News...